स्वच्छता मोहिमेअंतर्गत तिसऱ्या दिवशी वाहतुकीचे मुख्य केंद्र असलेल्या पुणे बस स्थानक परिसरात साफसफाई

 स्वच्छता मोहिमेअंतर्गत तिसऱ्या दिवशी वाहतुकीचे मुख्य केंद्र असलेल्या पुणे बस स्थानक परिसरात साफसफाई

शाळांचे विद्यार्थी, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महानगरपालिका कर्मचारी सहभागी 

अहमदनगर - स्वच्छता ही सेवा अभियानाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (२० सप्टेंबर) नगर महानगरपालिकेच्या वतीने पुणे बस स्थानक परिसर, स्वस्तिक चौक व टिळक रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, राजयोग प्रतिष्ठान गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महानगरपालिकेच्या केडगाव उपकार्यालयाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

पुणे बस स्थानक परिसरात साचलेला कचरा मोहिमेत उचलण्यात आला. परिसरात झाडलोट करण्यात आली. तेथील प्रवासी, नागरिकांशी संवाद साधून स्वच्छता राखण्यासाठी आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक झळकावले. बसस्थानक परिसरातील जुना साचलेला कचरा उचलण्यात आल्याने परिसर स्वच्छ झाला. त्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने जेट मशिनद्वारे टिळक रस्ता धुवून स्वच्छ केला. 

शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. घंटागाडीद्वारे कचरा संकलन व्यवस्थेत सुधारणा केल्या जात आहेत. नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. परिसरात रस्त्यावर कचरा टाकू नये. घंटागाडी न आल्यास महानगरपालिकेने जाहीर केलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

स्वच्छता ही सेवा अभियानाच्या चौथ्या दिवशी शनिवारी (२१ सप्टेंबर) माळीवाडा बसस्थानक परिसरात मोहीम राबवण्यात येणार आहे. यात महिला बचत गटांच्या सदस्या, सीताराम सारडा विद्यालयाचे विद्यार्थी, महानगरपालिकेच्या लेखा विभाग व लेखा परीक्षण विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या अभियानात नागरिकांनी, सामाजिक संघटनांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post